एका क्लिकने गरमागरम खाद्यपदार्थ घरपोच पुरवणारे स्विगी

विचार करा, तुम्ही तुमच्या खास मित्रमैत्रिणींसोबत घरी गप्पा मारत बसला आहात. सर्वांना मधेच भूक लागली. तुम्ही मोबाइल काढलात, तुमच्या परिसरातील सर्व हॉटेल्समधील मेन्यू बघून सर्वोत्तम पदार्थ सर्वोत्तम किमतीत बुक केलात आणि थोड्याच वेळात तुम्हाला तुमची गरमागरम ऑर्डर घरपोच मिळाली. किती छान ना! हीच कल्पना नंदन रेड्डी, श्रीहर्ष मजेती आणि राहुल जैमिनी यांनी ‘स्विगी’ रूपात आज प्रत्यक्षात आणली आहे. स्विगी अ‍ॅप डाऊनलोड केल्यावर आपल्या समोर आपल्या परिसरातील सर्व हॉटेल्स, कॅफे इत्यादींची यादी येते. त्यानंतर आपण आपल्याला हव्या त्या हॉटेलमधला हवा तो मेन्यू निवडून स्विगीवर ऑर्डर देऊ शकतो आणि घरबसल्या काही मिनिटांत आपल्या घरी तो मेन्यू स्विगीचा कर्मचारी घेऊन येतो. राहुल जैमिनी हा एक आय.आय.टी. इंजिनीअर, तर श्रीहर्ष मजेती हा आय.आय.एम. कलकत्ता आणि बिट्स पिल्लानीचा माजी विद्यार्थी आहे.

भारतातील हॉटेल इंडस्ट्रीचे स्वरूप बदलण्याचे त्याचे स्वप्न आहे. नंदन रेड्डीने बिट्स पिल्लानीमधून भौतिकशास्त्रात एम.एस्सी. केले, परंतु त्याचा कलसुद्धा फूड इंडस्ट्रीतच आहे. स्विगीची सुरुवात २०१४ च्या डिसेंबर महिन्यात झाली. सुरुवातीला फक्त बंगळुरूमध्ये स्विगी कार्यरत होते. आज निव्वळ २३ महिन्यांत स्विगी बंगळुरूसह मुंबई, पुणे, दिल्ली, गुडगाव, कलकत्ता, हैदराबाद, आणि चेन्नई अशा आठ शहरांत ग्राहकांना त्यांच्या आवडीचे पदार्थ घरपोच पुरवत आहे. प्रत्येक यशस्वी स्टार्टअपच्या मागे एक उत्तम कल्पना आणि लोकांना होणार्‍या त्या कल्पनेचा उपयोग हे असते. लोकांना घरपोच गरमागरम खाणं, तेही त्यांच्या आवडत्या रेस्टाँमधलं पुरवणं, हे स्विगीचं मुख्य उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टपूर्तीसह स्विगी आपल्या ग्राहकांची पुरेपूर काळजी घेते. सुरुवातीला स्वतःच्या खर्चातून नंदन, श्रीहर्ष आणि राहुल यांनी स्विगी सुरू केले आणि आज स्विगी गुंतवणुकीच्या तिसर्‍या फेरीत आहे.

लोकांचा जास्तीत जास्त विश्वास मिळवून मोठे होत जाणे आणि भारतातील खाण्याचे स्वरूप उत्तमोत्तम करून ग्राहक मित्र होणे हे स्विगीचे ध्येय आहे. आज भारतातील उत्तम स्टार्टअप्सच्या यादीत स्विगीचे नाव नोंदवले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares
error: Content is protected !!