झोपडपट्टीतील तरुणी बनली उपजिल्हाधिकारी ! मनिषा दांडगे हिच्या जिद्दीची कहाणी ??

ज्यांचे ध्येय निश्चित असते. ते कुठल्याही बिकट परिस्थितीतून मार्ग काढत आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करतात. झोपडपट्टीत छोट्याशा घरात अत्यंत हलाखीची परिस्थिती असताना मनीषा दांडगे या तरुणीने शिकून खूप मोठी अधिकारी व्हायचे स्वप्न उराशी बाळगले. आपल्या स्वप्नांचा सातत्याने पाठलाग करणाऱ्या मनीषाची नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेद्वारे उपजिल्हाधिकारीपदासाठी निवड झाली आहे. चौथी पर्यंत शिक्षण झालेल्या मनीषाच्या आई-वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

जिद्दी आणि मेहनती मनीषा आता केंद्रीय लोकसेवा आयोगाची तयारी करून आयएएस होण्याचे मोठे स्वप्न पहाते आहे. ही तिच्यातल्या जिद्द आणि सकारात्मकतेची कहाणी आहे.

मनीषा हिचे दुसरीपर्यंतचे शिक्षण महापालिकेच्या शाळेत झाले. तिसरीपासून तिने बळीराम पाटील हायस्कूलमध्ये शिक्षण घेतेले. दहावीनंतर सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयातून तिने बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली. बारावीत मागासवर्गीयांतून गुणवत्ता यादीत प्रथम येण्याचा बहुमान मनीषा हिने मिळवला त्यानंतर अभियांत्रिकीला जाऊन बी. टेक. पूर्ण केले. बी.टेक. नंतर स्पर्धा परीक्षेची तयारी तिने सुरु केली.वर्षभर झपाटून अभ्यास केल्यानंतर नुकत्याच लागलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली आणि तिची उपजिल्हाधिकारी पदावर निवड झाली.

औरंगाबाद शहरातील सिडको एन-७ परिसरातील आंबेडकरनगरात छोट्याशा घरात वजा झोपडपट्टीत मनीषाने आपले शिक्षण पूर्ण केले. तिचे वडील प्रल्हाद दांडगे आपल्या कुटुंबासह जालना जिल्ह्याच्या जाफराबाद तालुक्यातील आराधखेडा येथे वास्तव्यास होते. मात्र कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कामाच्या शोधात त्यांनी ३० वर्षापूर्वीच औरंगाबाद शहर गाठले. जेमतेम शिक्षण असल्याकारणाने त्यांना स्थायी नोकरी मिळेना. त्यामुळे मिळेल ते काम करत त्यांनी सिडको एन-७ परिसरातील आंबेडकरनगरात छोट्याशा घरात त्यांनी आपला संसार सुरू केला. मनिषाचे वडील मिस्त्रीकाम करत मात्र आपल्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन चांगल्या पदावर नोकरी करावी असे त्यांना वाटायचे. त्यांनी काबाडकष्ट करून आपल्या दोन मुली व एका मुलाला शिकवले. त्यांच्या कष्टाचे खऱ्या अर्थाने चीज झाले. मनीषाने त्यांची इच्छा पूर्ण केली.

मनीषा सांगते की, “ माझे आई-वडील फार शिकले नाही, पण शिक्षणाचे महत्व त्यांनी जाणले आणि आम्हा मुलांनी खूप शिकून चांगल्या पदावर नोकरी मिळवावी अशी त्या दोघांची इच्छा होती. आज मी त्यांची इच्छा पूर्ण करू शकले याचा मला खूप आनंद आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी “शासनकर्ती जमात व्हा‘ असे म्हटले आहे. शिक्षणाच्या माध्यमातून ‘राज‘ करण्याची संधी आहे. खऱ्या अर्थाने राज्य करतात ते उच्चपदस्थ अधिकारीच. म्हणून आपण बाबासाहेबांनी दिलेल्या संदेशाचे आचरण करून त्यानुसार कृती केली. उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली असली तरी जिल्हाधिकारी होणे हे माझे ध्येय आहे आणि त्यादृष्टीने मुंबईमध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची तयारी करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1Shares
error: Content is protected !!