व्हीलचेअरवरचा विवाह ….: एक स्वर्णिम सोहळा

वर सर्वच बाबतीत सुदृढ तर वधू शरीराने अपंग…तिचे संपूर्ण आयुष्यच व्हीलचेअरवरचे.

लहाणपणी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तिला आलेलं हे अपंगत्व.पण तिची जगण्याची उमेद मानसिक अपंगत्व आलेल्यांपेक्षाही कितीतरी पटीने मोठी.ती कविता करायची.कथा लिहायची.तिच्या कविता,कथा अनेक वृत्तपत्रांत प्रसिद्ध होत होत्या.ती विविध विषयांवर लिहायची.आपल्या अपंगत्वावर मात करुन ती नवी क्षितिजे शोधू लागली.तिने साहित्याला जवळ केले.ती नवनवे लेखन करु लागली.

साहित्यक्षेत्रात तिचे नाव होऊ लागले.अनेक पुरस्कार तिला या काव्यसंग्रहासाठी मिळाले.अशातच एके दिवशी बंसींनी मंजिरीच्या वडिलांना तिच्या लग्नाची मागणी घातली.आपली मुलगी अशी,आयुष्यभर चालू न शकणारी,व्हीलचेअरवरचे तिचे आयुष्य.सर्व बाबतीत सुदृढ असलेल्या व्यक्तिने केलेली मागणी हा वेडेपणा आहे म्हणत मंजिरीच्या वडिलांनी बंसीला स्पष्ट नकार दिला.पण आता बंसी आणि मंजिरी यांची ही अनोखी प्रेमकथा आकार घेऊ लागली होती.तिच्यातील प्रतिभेला नवा आयाम देण्यासाठी लग्न करणार तर मंजिरीशीच अन्यथा नाही,असा ठाम निश्चय आता बंसींनी केला होता.या त्याच्या निर्णयाला त्याच्या कुटूंबियांनी सहकार्य केले.मंजिरीच्या कुटूंबियांची समजूत घालण्याचे काम सुधीर गायकी सर यांनी केले. आणि ही अनोखी प्रेमकथा चार/पाच वर्षांनंतर दि.७ फेब्रुवारीला हिंगणघाट जि.वर्धा येथे विवाहबंधनाच्या पवित्र धाग्यात बांधल्या गेली.

आजच्या या दिखाऊ जमान्यात मुलगी कमी उंचीची आहे,दिसायला नीटनेटकी नाही,सावळी आहे,नाकीतोंडी व्यवस्थित नाही,चालताना पाय अडखळते या अशा अनेक शारिरिक बाबींशिवाय तिचं शिक्षण,तिच्या वडिलांची आर्थिक सुबत्ता याही बाबी निरखून पाहिल्या जातात.अशाही जमान्यात बंसी कोठेवार यांचेसारखा देवदूत या भूतलावर अस्तित्वात आहे यावर विश्वास बसणं कठीण आहे.उभं आयुष्य एका यज्ञाप्रमाणे व्यतित करायचं असताना त्यांनी घेतलेला हा निर्णय प्रचंड इच्छाशक्तीचा विजय आहे.आज त्यांच्या स्वागत समारंभाला उपस्थित अनेक कवी,लेखक,गायक,कलावंतांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या अनोख्या लग्नाच्या सोहळ्याला मानवंदना देत या स्वर्णिम सोहळ्याचे आपण साक्षिदार आहोत या भावनेने कृतार्थ झाल्याचे भाव सा-यांच्याच नजरेत होते.

सुरेश डांगे

चिमूर,९ फेब्रुवारी २०१८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

41Shares
error: Content is protected !!