खर्च करण्याच्या 5 सवयी बदला आणि लखपती व्हा !

पैशाने पैसा वाढतो’ असं म्हणतात. म्हणजे तुम्ही जितकी जास्त गुंतवणूक कराल तितके रिटर्नस जास्त मिळतील, असे सोप्पे गणित आहे. मात्र गुंतवणूक हाच केवळ पैसे वाढवण्याचा मार्ग आहे, असं नाही. तर सेव्हिंग म्हणजेच तुम्ही तुमच्याकडील पैशांची बचत कशी करता यावरही तुमची श्रीमंती अवलंबून आहे. तसेच हे बचत केलेले पैसे दीर्घ कालावधीसाठी योग्य पद्धतीने गुंतवल्यास लाखो रुपयांचा फायदा होऊ शकतो.

उदाहणच द्यायचे झाले तर रोज फक्त ५० रुपये या हिशोबाने तुम्ही ४० वर्षांसाठी गुंतवणूक केली, तर तुम्हाला किती पैसे परत मिळतील याचा अंदाज बांधू शकता का तुम्ही? काय म्हणता एक लाख… दोन लाख… पाच लाख… नाही इतके कमी नाही तर ४० वर्षांसाठी रोज ५० रुपये गुंतवले तर तुम्हाला ४० वर्षांनंतर चक्क ५२ लाख २५ हजार एवढी रक्कम मिळेल. म्हणजेच ७ लाख २० हजारांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला ४५ लाख व्याज मिळेल. आता हे वाटते तितके सोप्पे नसले तरी गुंतवणूक आणि आहे तो पैसा आपल्या सवयी बदलून कसा वाचवता येईल, याकडे लक्ष द्यायला हवे. फायनान्शियल एक्सप्रेसने अशाच पाच खास टिप्स दिल्या आहेत ज्या तुम्हाला तुमच्याकडील पैसे वाचवण्यास आणि वाढवण्यास मदत करतील.

1) बाहेर खाणे कमी करा –

हॉटेलमध्ये खाणे किंवा कॉफीसाठी कॉफी शॉपला जाणे यासाठी आता काही कारण लागत नाही. म्हणजे अनेकजण मित्रांना भेटण्यासाठी किंवा कुटुंबाला ट्रीटमध्ये किंवा इतर कारणांसाठी हॉटेलिंगला प्राधान्य देतात. महिन्यात दोन तिनदा हॉटेलमध्ये खाणे काही अयोग्य नाही. मात्र सतत हॉटेल आणि बाहेर खाण्यावर होणाऱ्या खर्चाला आळा घालून तुम्ही महिन्याचे एक हजार रुपये जरी वाचवले तरी तुमचा भरपूर फायदा आहे. प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये वाचवून ते खाण्यावर उडवण्याऐवजी तुम्ही आठ टक्के व्याजदराने २० वर्षांसाठी गुंतवले तर तुम्हाला ५ लाख ९२ हजार रुपयांची एक हाती रक्कम २० वर्षांनतर मिळेल.

तर ३० वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास दर महिना एक हजार रुपयांच्या गुंतवणुकीने तुम्हाला १४ लाख ९४ हजार आणि ४० वर्षांनंतर तर चक्क ३४ लाख परत मिळतील. आहे की नाही गुंतवणूकीचा सोप्पा पर्याय.

2) बिले वेळेत भरणे –

असे अनेकजण आहेत जे कोणतीही बिलं वेळेत न भरल्याने महिन्याला सर्व बिलांवर अंदाजे ५०० ते १००० रुपयांपर्यंतचा दंड भरतात मग ते फोनचे बिल असो, लाईटचे, गॅसचे किंवा पाण्याचे. मात्र वेळेत बिलं भरण्याची सवय लावून महिन्याला ५०० रुपये जरी वाचवले तरी खूप फायदा महिन्याच्या बजेटमध्ये होऊ शकतो मात्र दीर्घ गुंतवणूक केली तर लाखो रुपये परतही मिळतात. म्हणजे ५०० रुपये प्रती महिना आठ टक्क्यांच्या दराने ४० वर्षांसाठी गुंतवल्यास तुम्हाला ४० वर्षांनतर १७ लाख रुपये मिळतील.

3) मर्यादित खरेदी –

अनेकदा आपण खरेदीसाठी गेल्यावर गरजेच्या नसणाऱ्या वस्तूंचीही खरेदी करतो. खास करुन सुपरमार्केटसमध्ये अनेकदा गरज नसलेल्या गोष्टींची खरेदी करुन घरी आल्यानंतर त्या वस्तूंची आपल्याला गरज नव्हती, याची जाणीव होते. अशीच नको असलेली खरेदी कमी करुन महिन्याला दोन हजार रुपये वाचवले तरी भविष्यांत या गुंतवणूकीतून मोठे रिटर्नस मिळू शकतात. म्हणजे आठ टक्के व्याजदराने ४० वर्षांसाठी प्रती महिना दोन हजार रुपये गुंतवले तरी ७० लाख रुपये एक हाती मिळू शकतात. हीच रक्कम ३० वर्षांसाठी गुंतवल्यास ३० लाख रुपये गुंतवणूकदारांना मिळू शकतात.

4) धुम्रपान सोडणे –

हवेत पैसा उडवण्याचे माध्यम म्हणजे धुम्रपान. पैशांशिवाय आरोग्याला होणारी हानी आलीच. १० रुपयांची एक प्रमाणे दिवसाच्या २० सिगारेटचे पैसे सिगारेटवर न उडवता बाजूला काढून ठेवले तरी महिन्याचे सहा हजार रुपये वाचतात. प्रत्येक महिन्याला हेच सहा हजार आठ टक्के दराने गुंतवल्यास ४० वर्षांत चक्क गुंतवणूकदार दोन कोटींचा मालक होऊ शकतो.

5) आठवडाभर खरेदी नको –

एखाद्या आठवड्यामध्ये कमीत कमी गोष्टी विकत घेण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे ज्या खूपच गरजेच्या गोष्टी आहेत त्यासाठीच पैसे खर्च करण्याचा महिन्यातून एखादातरी आठवडा असावा. यामध्ये भाज्या, रोजच्या वापरातल्या वस्तू, औषधे वगळली तरी महिन्याच्या शेवटी मोठी रक्कम वाचते.

गुंतवणूक आणि बचत यावर लक्ष दिले पाहिजे. यातून भविष्यात मिळणारे उत्पन्न कमी-जास्त होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares
error: Content is protected !!