मातेसह सासुलाही ….अमरत्व देणारी डॉक्टर

रत्नागिरीचं जिल्हा शासकीय रुग्णालय. मृत्युपश्चात नेत्रदानाचं महत्त्व आत्ता कुठं लोकांना थोडफार कळू लागलं आहे. अवयवदानाबद्दल केवळ जनजागृतीपर्यंतच न थांबता दुःख बाजूला सारून इथल्या नेत्रचिकित्सक डॉ. सोनाली पाथरे यांनी आदर्श घालून दिला आहे. नुकतंच त्यांच्या सासूबाईंचं निधन झालं. आणि त्याआधी काही काळ आईचं.

डॉ.सोनाली नेत्रदानाविषयी जनजागृती करतात. सोनाली यांच्या आईचं साधना भगाडे यांचं निधन झालं आणि आपल्या कुटुंबापासून अवयवदानाच्या अंमलबजावणीची सुरुवात करायला हवी. हे जाणून त्यांनीच स्वतः आईच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करून डोळे काढले. त्यानंतर काही काळाने त्यांच्या सासूबाईंचं निधन झालं. यावेळी पती पराग पाथरे यांना मानसिक आधार देतानाच सासू अंजली पाथरे यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करून त्यांचे डोळे कोल्हापूर लॅबला पाठवून दिले. आई आणि सासू दोघींनीही केलेली नेत्रदानाची इच्छा सोनालीने पूर्ण केली. आणि 2 दोन गरजू अंध व्यक्तींच्या जीवनात प्रकाशकिरण पोचला.

खरं तर, जवळच्या व्यक्तीच्या मूत्यूसमयी माणूस गळून जातो. तरीही, आपल्या सासूबाई आणि आईची नेत्रदानाची इच्छा पूर्ण करताना, स्वतःच शस्त्रक्रिया करणाऱ्या सोनाली यांचं कौतुक करावं तितकं कमीच. एकीकडे जवळच्या व्यक्तीला कायमचं गमावल्याचं दुःख तर दुसरीकडे डॉक्टर म्हणून कर्तव्य बजावत त्यांनी दोन अंधांना दृष्टी मिळवून दिली.

डॉ. सोनाली म्हणतात, “आई आणि सासूबाई दोघीही, आज डोळ्यांच्या रूपात समाजात वावरत आहेत. यापेक्षा मोठी आनंदाची दुसरी बाब नाही. जर दोघींनीही नेत्रदानाचा संकल्प केला नसता, तर या आनंदाचा अनुभव मिळाला नसता. आपल्या मायेची माणसं आपल्या भोवतीच वावरत असल्याचा भास होतो

जान्हवी पाटील, रत्नागिरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

212Shares
error: Content is protected !!