रस्त्यावर जगणाऱ्या महिलांच्या सेवेसाठी……’इंद्रधनू’ अनाथालयमुळे  हक्काच घर….

न संपणाऱ्या वेदनांची लढाई…. अनाथ, मनोविकलांग महिलालांच्या सेवेसाठी

नगर शहर, परिसरात किंवा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात एखादी अनाथ, वेडसर व रस्त्यावर फिरणारी महिला असल्याचे डॉ. राजेंद्र व डॉ. सुचेता धामणे यांना कळाले की ते लगेचच त्या व्यक्तीला घेऊन येतात अन तिथपासून धामणे दाम्पत्याची सुरु होते न संपणाऱ्या वेदनांची लढाई. नगर-मनमाड रस्त्यावर अहमदनगर शहरापासून साधारण वीस किलोमीटरवरचं शिंगवे गावं. साधारण तीन हजार लोकसंख्या. या गावाला गावपण आलं ते डॉ. राजेंद्र व डॉ. सुचेता धामणे यांच्या ‘इंद्रधनु’ अनाथलयामुळे. या अनाथालयात तब्बल १०५ अनाथ, मनोविकलांग महिला आणि त्यांची १५ मुले कायमस्वरूपी राहत आहेत.

महामार्गावर, एखाद्या गावात, शहरात बेवारस, मनोरुग्ण महिला सापडल्या की त्यांना तातडीने तेथून घेऊन यायचं. आल्यावर प्रथम स्वच्छ करायचं. त्यांच्या सर्व वैदकीय तपासण्या, मनोविश्लेषण करून त्यांच्यावर उपचार सुरु करायचे. एखादी महिला रस्त्यावर झालेल्या बलात्कारातून गर्भवती झालेली असते. आपल्या पोटात बाळ आहे ही जाणीवही तिला नसते. तिच्या प्रसूतीपूर्व तपासण्या करायच्या. ती मुळातच उकिरड्यावरच अन्न खाऊन कुपोषित आणि आजारी असते. मग तिची विशेष काळजी धामणे दाम्पत्य घेतात. बाळंतपण पार पाडायचं, तिची काळजी घ्यायची आणि पुढे या मुलांना आपलं नाव देवून त्यांचे पालकत्व स्वीकारायचं. ही मुलं कायदेशीर अडचणीमुळे दत्तक जात नाहीत. त्यांचा सांभाळ आपली मुलं म्हणून करायचा हेही एक महत्वाचं काम.

हे सगळं कसं सुरु झालं त्याची ही गोष्ट. डॉ. राजेंद्र व डॉ. सुचेता यांचे नगर शहरात खाजगी रुग्णालय. स्वभाव संवेदनशील. त्यामुळे मदतीलाही तत्पर. एक दिवस त्यांना एक वेडसर व विकलांग महिला विष्ठा खाताना दिसली. ही गोष्ट त्यांच्या नजरेसमोरून हटेना. या महिलांचं आयुष्य नेमक काय, कसं आहे याचा विचार त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यानंतर त्यांनी वेडसर, विकलांग, अपंग महिलांची सेवा करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला घरुन निघाले की या महिलांना देण्यासाठी खाद्यपदार्थ सोबत ठेवू लागले. दिवसभरात तब्बल साठ ते सत्तर अनाथ, निराधार, अपंग, मनोरुग्णांना रोजच घरचं जेवण द्यायला सुरुवात झाली.

एकदा एक विकल अवस्थेतील आजीबाई त्यांना रस्त्यात दिसल्या. सारखं ‘मरायचं आहे’ असं म्हणत होत्या. त्यांच्या मुलाने त्यांना त्या मनोरुग्ण, अपंग झाल्या म्हणून रस्त्यावर टाकून दिलं होत. या आजीबाईंना डॉक्टरांनी घरी आणायचं ठरवलं. हाच खरा दोघांच्याही कसोटीचा क्षण! कारण या लोकांना खायला घालण्यासाठी दररोज ६०-७० डबे तयार करण, रस्त्यावरच त्यांच्यावर उपचार करण ठीक होतं. पण, एकदम अशा घाणीने माखलेल्या.. देहधर्माची शुद्ध हरवलेल्या एखाद्या महिलेला घरीच घेवून यायचं म्हणजे अतिच झालं. पण काहीही विचार न करता सुचेता यांनी मात्र लगेच घेऊन या..असं सांगितल. इथूनच खऱ्या अर्थाने ‘इंद्रधनू’ची सुरुवात झाली.

महामार्गावर, शहरात, गावखेड्यात येथील शहाण्या म्हणवल्या गेलेल्या व्यवस्थेने मनोरुग्ण आणि गंभीर आजारांनी त्रस्त महिला मरण्यासाठी सोडून दिलेल्या असतात. त्या अनन्वित लैंगिक अत्याचाराची शिकार होतात. त्यामधून कधी गर्भवती होतात आणि रस्त्यावरच फिरत राहतात. त्याचं पुढे काय होत? आपला समाज रस्त्यावर जगणाऱ्या बाईला मात्र माणूसही मानण्यास तयार नसतो. हा विरोधाभास पाहून आपणचं अशा महिलांच्या सेवेसाठी स्वखर्चातून अनाथालय सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचं डॉ. राजेंद्र सांगतात. ‘इंद्रधनू’ मुळे त्यांना हक्काच घर मिळालं.
आज ‘इंद्रधनू’ या नावाबरोबरच ‘माऊली’ या नावानेही संस्था ओळखली जाते.

डॉ. राजेंद्र धामणे व डॉ. सुचेता धामणे
संपर्क – ९८ ६० ८४७९५४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

354Shares
error: Content is protected !!