तुम्हीही विचार करा,,,, कारण आपल्याही घरात मुलगी आहेच ….

आवर्जून वाचावा असा लेख …विषय गंभीर आणि सध्याच्या मुख्यत्वे शहरी मुलींच्या बेधुंद वागण्यावर प्रकाश टाकणारा आहे .. काळजी म्हणून तरी हा लेख वाचून तुम्हीही विचार करा कारण आपल्याही घरात मुलगी आहेच.

त्या दिवशी बसमध्ये शेजारी एक पन्नास पंचावन्न च्या आसपास असलेल्या एक महिला येऊन बसल्या. दिसायला छान होत्याच पण चेहऱ्यावर बुद्धिमत्तेचं तेज दिसून येत होतं.माझ्याकडे बघून त्या ओळखीचं हसल्या. नेमकी ट्रॅफिकमध्ये बस तासभर अडकली आणि नकळत त्यांच्याशी बोलता बोलता आमचा छान संवाद सुरु झाला. त्या फॅमिली कोर्टात सल्लागार म्हणून काम करत होत्या शिवाय त्या मानसोपचारतज्ज्ञ पण होत्या. गप्पांच्या ओघात त्यांच्या बोलण्यात एक वाक्य सहज आलं ” आजकालच्या मुली ‘स्वातंत्र्य’ खूप चुकीच्या पद्धतीने घेतात. “स्त्री मुक्ती” ह्या शब्दाचा अर्थ जर स्त्रियांनी नीट समजून घेतला नाही तर त्याची फळ भविष्यात त्या स्वतःच भोगणार हे वेगळं सांगायची गरज नाही.

सध्याची पिढी काही अपवाद वगळता नक्की जातेय कुठे ? संध्याकाळ झाली की ठिकठिकाणी बागेत , ब्रिजवर , एकांत जागांमध्ये जे काही सुरु असत ते बघून काय बोलावं ? पुरुष हा शेवटी पुरुषच असतो स्त्रीने स्वतःला जपलं पाहिजे हा संस्कार आजकाल आई मुलींना देते की नाही हा प्रश्न पडावा इतकी परिस्थिती गंभीर आहे. आपली मुलगी क्लास , कॉलेज , शाळा ह्याच नाव पुढे करून दुसरीकडे तर वळत नाही ना इथे पालकांनी लक्ष दिल पाहिजे.

आपल्या मुलीला आधी मुलगी म्हणून स्वीकारा… का मुलांसारखं त्यांना मोठं करण्याचा अट्टाहास ? निसर्गाने नेमून दिलेला भेद त्याचाही विचार झाला पाहिजे.

गेल्या दहा वर्षात खूप काही बदललं आहे.आजकाल मुलींपेक्षा मुलांच्या नजरेत मला लाज दिसू लागली आहे…. सर्व सामान्य मुली ( ह्याला अपवाद देखील खूप साऱ्या आहेत ) नको त्या दिशेने पुढे जाताना दिसून येतात. कुमार वयातील वाढलेल गर्भपातांच वाढलेलं प्रमाण काय दर्शवते ?आपली मुलगी बाहेर नक्की काय करते? तिचे मित्र मैत्रिणी कोण आहेत हे जाणून घेण्याची आजकाल आईवडिलांनाही तसदी घ्यावीशी वाटतं नाही आणि त्यांना वेळही नसतो…आम्ही मुलांना त्यांची “व्यक्तिगत स्पेस” देतो असे शेखी मिरवणारे आईवडील त्याच मुलांनी कोवळ्या वयात केलेल्या चुका निस्तरताना स्वतःकडे पाहायला विसरतात.

मनोरंजनाच्या , सामाजिक सुधारणेच्या नावाखाली सध्या जे काही सुरु आहे ते बघून तर निराश वाटू लागलं आहे. आणि सगळं योग्य आहे हे दाखवण्यात मीडिया पहिल्या क्रमांकावर आहे. मी स्वतः उच्च शिक्षित आहे.माझा मुलगा इंजिनियरिंगला आहे.खूप मोकळेपणाने बोलतो तो माझ्याशी … मला म्हणतो कशा वागतात ग मुली आजकाल ….? कधी कधी शरमेने आम्हा मुलांचीच मान खाली जाते.” मी काहीच बोलत नाही ….स्त्रीने लाज सांभाळली पाहिजे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ हाच होतो की तिने निसर्गाने देऊ केलेल्या शक्तीचा आणि देणगीचा सन्मान करावा….निसर्ग आपलं काम करतो ते स्त्रियांसाठी …. पुरुष मोकळाच रहातो हे मुलींनी समजून घेतलं पाहिजे.

अजून एक सध्या इंस्टावर काही फोटो येतात मुलींचे ..दारू पिणं, शिवराळ भाषेत बोलणं ,पार्ट्या करणं , स्मोकिंग बेधुंद वागणं हा नक्कीच सुधृढ जगण्याचा मार्ग नाही…. दिशाहीन करतात ग ह्या गोष्टी …तरुण मुलींच्या वाढत्या आत्महत्या.. खूप वाईट वाटतं मला …. पण काय करायचं , कुणाला समजवायचं हा प्रश्नच आहे. संस्कारांची वीण उसवत चालली आहे एवढं मात्र खरं .. काउंसलिंग ला आलेली कपल्स किंवा मुली … ह्या प्रश्नांची भीषणता अजून अधोरेखित होते …. ” असं म्हणून त्या गंभीर झाल्या… काही वेळाने म्हणाल्या ” पण तुझ्यासारख्या मूठभर मुलींमुळे अजूनही आशा जिवंत आहे. खूप साऱ्या क्षेत्रात मुली आघाडीवर देखील आहेत… पण तरीही निराशा वाटते खरी कारण फक्त मूठभर मुलींनीच फक्त मिळालेल्या स्वातंत्र्याचा अर्थ समजून स्वतःचा खरा उत्कर्ष साध्य केला आहे.

मी त्यावर फक्त हसले… त्यांचा निरोप घेताना मला खूप काही मिळालं होतं पण त्याचवेळी ज्या दिशेने समाज स्त्रियांसाठी बदलतोय त्या दिशेची दिशा कुठेतरी विचार देखील करायला लावत होती.

– मीनल सबनीस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

325Shares
error: Content is protected !!