२० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या. आर आर आबांची ही दोन रुपं एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं.

प्रसंग १- वोडाफोन कंपनीची जाहिरात जोरात सुरु होती. त्यातल्या त्या पग जातीच्या कुत्र्याने समस्त श्वानप्रेमींना वेड लावलेलं. विशेषत: बच्चे कंपनी. त्यात मग उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री असलेल्या आर आर आबांचा लहानगा चिरंजीव तरी कसा मागे असेल ?

पोराने बापाकडे हट्ट धरला. आबा मला असलं कुत्रं हवंच आहे. बालहट्टच तो. बरचं समजावुन पोरगं बधत नाही असं लक्षात आल्यावर मग चित्रकुट बंगल्यावरची यंत्रणा कामाला लागली. असली कुत्री कुठे मिळतात, कोण विकतं याची माहिती काढण्यात आली. आणि एके दिवशी गाडीतुन पग जातीच्या कुत्र्याच्या पिल्लांच लाकडाच्या बंद पेटीतुन बंगल्यावर दिमाखात आगमन झालं. गोंडस पिल्लं मस्तच दिसत होती. चिरंजीव एकदम खुष झाला. मग त्याची किंमत किती याची विचारणा झाली. त्या छोट्या पिल्लाची पाच आकडी किंमत ऐकुण आबा सचिंत झाले. मग तसल्या प्रकारच्या कुत्र्यांना खायला काय लागतं, औषधं कुठली लागतात, लसी कुठल्या लागतात या सगळ्यांची विचारणा झाली. त्या पिल्लाला सांभाळण्याचा मासिक खर्च किती याचा हिशेब करण्यात आला.

हा सगळा खर्च ऐकल्यावर आबांनी त्यांच्या लहानग्या मुलाला जवळ बोलावुन समजावुन सांगितलं की बाबा रे आपल्याला हा खर्च काही झेपणार नाही. छोटा मुलगा हिरमुसला पण त्या समजुतदार मुलाने पुन्हा आपल्या आबांकडे कुत्र्यासाठी हट्ट केला नाही.

प्रसंग २- चित्रकुट या बंगल्यावर आबा एकटेच रहात असत. उन्हाळ्याच्या सुट्टीत मात्र आबांचं कुटुंब अंजनीहुन सुट्टीसाठी मुंबईला येत असे. बरोबर भाऊ आणि बहीणींची पण मुलं असत. एरवी शांत आणि गंभीर असलेला चित्रकुट बंगला बच्चे कंपनी मुळे अगदी गजबजुन जात असे. एके दिवशी संध्याकाळी सर्व बच्चे कंपनीला घेवुन डीनरला जायचा बेत झाला. निघताना आबांनी माझ्याकडे पैसे ठेवायला दिले. एका गाडीत आबा आणि सगळ्या मुली आणि दुसर्‍या गाडीत सगळी मुलं आणि मी असा आमचा ताफा वरळीच्या कॉपर चिमणी या रॆस्टारंट कडे रवाना झाला. टेबल आधीच बुक करुन ठेवलेलं. मस्त गप्पा गोष्टी, हास्य मस्करी करत सगळ्या मुलांनी जेवणाचा आनंद घेतला.

कायम पोलीसांच्या गराड्यात असलेले आबा मुलांच्या सहवासात खुष होते. जेवण झाल्यावर बील घ्यायला मी गेलो तर हॉटेलवाला बीलच देईना. म्हणाला आमच्या हॉटेलमधे आबा आले हाच आमचा सन्मान आहे. मी त्याला समजावलं असं करु नका आबांना ते आवडणार नाही. तरी तो ऐकेना. मग मी आबांना ही गोष्ट सांगितली. ते म्हणाले असं केलं तर पुन्हा त्याच्या हॉटेलमधे पाय सुध्दा ठेवणार नाही असं त्याला बजावुन सांग. शेवटी हॉटॆलवाल्याचा नाईलाज झाला आणि त्याने बील दिले आणि मी ते चुकते केले. खरी गोष्ट पुढेच आहे. जातानाही आबा पुढच्या गाडीत होते. आबांचा छोटा मुलगा मागे मागच्या गाडीत माझ्या शेजारी बसला होता. त्याने हळुच मला विचारले ” काका, किती बील झालं हो ! ” मी स्तिमीत झालो. ज्याचे वडील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री होते त्या मुलाला कुतुहल होतं, काळजी होती की आपल्या वडीलांना ही पार्टी द्यायला किती खर्च आला असेल !!

एक वडील म्हणुन आर आर आबांची ही दोन रुपं. २० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या आबांनी आपल्या मुलांना कोणत्या संस्कारात वाढवले त्याची झलक देणारे हे प्रसंग. आजकालच्या साध्या नगरसेवकांच्या दिवट्यांचे रुबाब पाहिले की वरील प्रसंग हमखास आठवतात आणि आबांची तीव्रतेने आठवण होते.

लेख – संतोष डी. पाटिल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

296Shares
error: Content is protected !!