तिने जिद्दीनं केलं भावाला फौजदार ………..

सासुरे – “पोटासाठी तिनं पायी चाळ बांधिला… शिक्षणासाठी दिलं जीवन तोषिला…!’ एखाद्या चित्रपटाला साजेसं असं हे कथानक आहे समाजानं नाकारलेल्या, वडिलांच्या प्रेमापासून कायम पारखा राहिलेल्या, गरिबी अन् परिस्थितीनं बेजार झालेल्या, कोल्हाटी समाजात एका नाचणारणीच्या पोटी जन्म घेतलेल्या जिद्दी बहीण भावाची अन् त्यांच्या आईची. मोठ्या जिद्दीनं बहिणीनं भावाला फौजदार केलं आणि जणू तिच्या या जिद्दीपुढं आकाशदेखील ठेंगणं झालं! बार्शी तालुक्यातील सुमारे चार हजार लोकसंख्येचं भोईंजे गाव. कोल्हाट्याचं गाव अशीच त्याची ओळख. गावची ही ओळख पुसली ती कोल्हाट्याच्याच पोरानं.

आता हे गाव एपीआय बालाजी बबीता मुसळेचं गाव म्हणून परिचित होत आहे. गावातील कोल्हाटी समाजातील बबीता मुसळे या नाचणारणीच्या पोटी जन्म घेतलेल्या बालाजीस जन्मपासूनच अडचणींना तोंड द्यावं लागलं. ज्या समाजानं आणि परिस्थितीनं त्याच्या आईबरोबरच बहिणीलाही नाचायला भाग पाडलं, त्या समाजाचाच तो आदर्श बनलाय. बालाजीचं प्राथमिक शिक्षण भोईंजेत झालं. खरं तर कोल्हाटी समाजातील बायकांची मोठी अडचण असते ती म्हणजे त्यांची मुलं. कारण त्यांच्या जीवनात खूप अस्थिरता असते. या फाटलेल्या संसारास ठिगळ लावण्यासाठी आणि आपले भोग लेकरांना वाट्याला यायला नको म्हणून दृष्टिआड, बालाजीस माध्यमिक शिक्षणासाठी सर्जापूर (ता. बार्शी) येथील आश्रमशाळेत ठेवलं. त्याचं महाविद्यालयीन शिक्षण बार्शी, औरंगाबादला केलं. एम.ए. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयामधून पूर्ण केलं.

हजारविद्यार्थिदशेत असताना आपली खरी माहिती कळेल, या भीतीनं बालाजी एकटाच वावरायचा, फारसा कोणात मिसळायचा नाही, बोलायचा नाही. बालाजीचं शिक्षण पूर्ण झालं; पण याच काळात त्यानं प्रशासकीय सेवेत जाण्याचं स्वप्न उराशी बाळगलं. मात्र घरादाराला खाऊ घालणारी आई थकली होती. तिचं वय झालं होतं. वय होणं हा कोल्हाटी समाजातील स्त्रियांना लागलेला शापच. शेवटी उरला पर्याय एकच. कसंबसं शिक्षण घेतलेली बहीण पूजा. ऐन तारुण्यातील पूजाचं खरं तर हातावर मेंदी लावून हळदीच्या अंगानं मंडोळं बांधून बोहल्यावर चढण्याचं वय होतं; मात्र स्वप्नांचा चुराडा करत तिनं भावाचं स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी बोहल्याऐवजी लावणीच्या सुरांवर थिरकत गिरक्या घेणं स्वीकारलं.

मुजऱ्याच्या पैशातून तिनं बालाजीच्या प्रशासकीय सेवेच्या शिकवणीचा, परीक्षेचा भार वाहिला. अखेर पूजाच्या प्रयत्नांना यश आलं. बालाजी जिद्दीनं फौजदार झाला. गावातील पहिला अधिकारी होण्याचा बहुमान या कोल्हाट्याच्या पोरानं मिळविला. सध्या बालाजी नाशिक येथे सहायक पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत आहे. बालजी मुसळेंचा हा प्रवास चकीत करणारा आहेच; पण त्याग, प्रेम आणि दुसऱ्यासाठी जगणं काय असतं, हे स्वार्थाची जळमटं घेऊन वावरणारांच्या डोळ्यांत झणझणीत अंजण घालणारी ही पूजाची कृतीही कौतुकास्पद आहे! माझ्या यशामागं आईची मेहनत आणि पूजाचा प्रचंड त्याग आहे. या ऋणातून मी कधीच मुक्त होऊ शकत नाही. आजही कोल्हाटी समाजात अनेक हिरे लपलेले आहेत. मात्र त्यांच्यापुढं आव्हाने आहेत. या उपेक्षित मुलांसाठी पुण्यात लवकरच वसतिगृह सुरू करणार आहोत.

– बालाजी मुसळे, सहायक पोलिस निरीक्षक, नाशिकल्हाट्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

653Shares
error: Content is protected !!