प्रेरनादायी प्रवास कंपाउंडरचा झाला ….प्राध्यापक

विदर्भातील दुष्काळ अन्‌ रोजगाराची संधी नसल्याने अंबादास रोठेंनी नाशिक गाठले. बांधकामावर वॉचमन म्हणून राहायची सोय झाल्यावर त्यांनी अकोल्याहून बिऱ्हाड इथेच आणले. सगळ्यात धाकट्या नीलेशने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कंपाउंडर म्हणून कामाला सुरवात केली. शिक्षणाच्या दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे डॉक्‍टरांनी त्याच्याकडे वैयक्तिक लक्ष दिले. त्याचाच परिपाक म्हणजे, ते प्राध्यापक झाला.

गंगापूर रोडवरील आकाशवाणी केंद्राजवळील डॉ. प्रणिता गुजराथी यांच्याकडे रोठे कुटुंबातील थोरला उमेश कंपाउंडर म्हणून काम करत होता. त्याच्या शिक्षणाची सुरवात झाल्यावर थोरल्या बंधूच्या जागी नीलेशने कामाला सुरवात केली. उमेश राष्ट्रीय धावपटू असून, त्याची सध्या पोलिस दलात उपनिरीक्षक पदावर निवड झाली आहे. तो सध्या प्रशिक्षण घेत आहे.

उमेश आणि नीलेश यांच्या दोन्हीही भगिनींचा विवाह झालाय. नीलेश यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेईपर्यंत कंपाउंडर म्हणून काम पाहिले. आम्हा दोन्ही भावंडांच्या संगोपनापासून त्यांच्या शिक्षणाच्या वाटचालीत डॉ. गुजराथी यांचा सिंहाचा वाटा राहिल्याचे प्रा. नीलेश सांगतात. एम.कॉम., एम.बी.ए., नेट-सेट, पीएच.डी. अशा पदव्या त्यांनी संपादन केल्या आहेत.

जुन्या नाशिकमधील महापालिकेच्या शाळेत उमेश आणि नीलेश या दोन्ही भावंडांचे शिक्षण पाचवीपर्यंत झाले. नवरचना शाळेत पुढील शिक्षण झाले. वर्गशिक्षिका डॉ. गुजराथी यांच्या पेशंट असल्याने त्यांनी डॉक्‍टरांकडे काम करण्याचे सुचवले, असे सांगून प्रा. नीलेश म्हणाले, की डॉक्‍टर कामांचे पैसे वडिलांना द्यायच्या. एवढेच नव्हे, तर डॉक्‍टर माझ्याकडून अभ्यास करून घ्यायच्या. सकाळी 9 ते 10 दवाखाना, सकाळी 11 ते सायंकाळी 5 शिक्षण आणि पुन्हा सायंकाळी 6 ते रात्री 9 दवाखाना असा दिनक्रम ठरलेला होता.

दवाखान्यात मला अभ्यासाबरोबरच व्यावहारिक ज्ञान मिळाले. दवाखान्यात विविध क्षेत्रांतील लोक रुग्ण म्हणून यायचे. त्यात हॉटेल मालक, कंपनी मालक, वकील, अभियंता असायचे. रुग्ण आणि माझ्यात जरी आर्थिकदृष्ट्या फरक असला, तरी लोकांच्या सहवासात राहून वागणे, बोलणे, भाषा, संस्कृती, व्यवस्थापन अशा विविध गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांच्याकडे बघून आपल्याला पण काहीतरी करायचे अशी उर्मी मनात निर्माण व्हायची. पुढे पदवी मिळेपर्यंत मी त्यांच्याकडे काम करत होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares
error: Content is protected !!