पोळ्या लाटता लाटता … मेजवानी’ हे रेस्टॉरन्ट न्यू जर्सीमध्ये …

सुप्रिया शेटय़े तशा मुंबईच्या. आई-वडील दोघेही गोव्याचे. वडील नोकरीनिमित्त मुंबईत स्थिरावले. ‘‘कुठल्याही कामाला कमी समजू नये, कष्टाला कधी नाही म्हणायचं नाही आणि संसाराचं दुसरं चाक म्हणून आपली जबाबदारी झटकायची नाही अशी पालकांची शिकवण कामी आली. निर्णय घेतला आणि पोळ्या करून द्यायला लागले. जिद्द आणि कष्ट याच मुळे त्याच्याही पुढे जात आज महाराष्ट्रीय पदार्थ देणारं ‘मेजवानी’ हे रेस्टॉरन्ट न्यू जर्सीमध्ये सुरू

सुप्रिया शेटय़े तशा मुंबईच्या. आई-वडील दोघेही गोव्याचे. वडील नोकरीनिमित्त मुंबईत स्थिरावले. खाऊनपिऊन सुखी असं कुटुंब. तीन भावंडांत सुप्रिया धाकटय़ा, त्यामुळे लाडाच्या. आई गृहिणी असल्याने घरकामाचे संस्कार सगळ्यांवरच झालेले. मात्र धाकटी असल्याने सुप्रिया यांच्या वाटय़ाला स्वयंपाक कधी फारसा आलाच नाही. आई सुगरण असल्याने उत्तम पदार्थ चाखायला मात्र मिळायचे. परळला राहाणाऱ्या सुप्रिया यांचं शालेय शिक्षण दादरच्या किंग जॉर्ज शाळेमध्ये झालं. त्यानंतर वाणिज्य शाखेतील पदवी घेऊन कुटुंबाची गरज म्हणून त्यांनी लगेच छोटय़ामोठय़ा नोकऱ्या करायला सुरुवात केली. एका नोकरीदरम्यान त्यांना त्यांचा जीवनसाथीही भेटला. त्यांनी घरच्यांच्या संमतीने प्रेमविवाह केला. दरम्यान शामराव विठ्ठल बँकेत सुप्रिया यांना नोकरी लागली. संसार आनंदाने सुरू होता. मुलगा झाल्याने त्या आनंदावर कळसच चढला जणू. अशी १५ वर्षे गेली. सुप्रिया आता बँकेत अधिकारी पदावर पोहोचल्या होत्या.

इथवर जीवनाचा प्रवास काहीसा संथ आणि तरीही आनंदाचा होता. त्यांचे सासू-सासरे अमेरिकेत वास्तव्याला असल्याने त्यांच्या पतीला तिकडे जाण्याची ओढ होती. दरम्यान, सासऱ्यांच्या निधनानंतर सासूबाई एकटय़ा पडल्याने २००७ मध्ये त्यांनी अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला..नवऱ्याच्या कंपनीने चांगली ऑफर देऊ केल्यानं आम्ही अमेरिकेला जाण्याचा निर्णय पक्का केला. मात्र तिथं गेल्यानंतर चार महिन्यांतच नवऱ्याची नोकरी गेली. जी काही जमापुंजी होती ती तिथल्या लहानसहान गरजांवरती खर्च झाली होती. हाती पैसा नाही आणि त्यात परदेश. काय करायचं पुढे हा प्रश्न आ वासून उभा होता

सुप्रियांनी तिथे नोकरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची नोकरीच्या ठिकाणी पिळवणूक झाल्यानं त्यांनी नोकरी सोडली. आता तिथे तग धरण्यासाठी काहीतरी हातपाय हलवणं गरजेचं झालं. अखेर खूप निग्रहपूर्वक त्यांनी पोळ्या करून देण्याचा निर्णय घेतला. सुप्रियांनी गरज म्हणून हे काम स्वीकारलं होतं, मात्र जे काही करायचं ते पूर्ण सर्वस्वाने, हा त्यांचा स्वभाव. त्यामुळे त्यांनी सगळं मन लावून केलं. पहिल्यांदा मिळालेली १०-१२पोळ्यांची ऑर्डर वाढून ती २०० ते २५० पोळ्यांपर्यंत गेली. ‘पोळ्या करण्याबरोबरचलोकांच्या घरी स्वयंपाक , बेबी सिटिंगही केलं. हळूहळू जेव्हा प्रसिद्धी होऊन लोक स्वत:हून ऑर्डर घेऊन यायला लागले तेव्हा घरगुती जेवणाच्या ऑर्डर घ्यायला सुरुवात केली. न्यूजर्सीला मुंबईतील लोक मोठय़ा प्रमाणात राहतात. हे जेवण हे खोबऱ्याच्या वाटणातलं असल्याने त्यांना जेवण आवडायचं.

सुप्रियांनी सलग सहा वर्षे मेहनत केल्यानंतर व ग्राहकांची पसंती, गर्दी वाढल्यानंतर स्वत:चं रेस्टॉरंट सुरू करण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान त्यांच्या पतीनेही सात-आठ ठिकाणी नोकरी करून पाहिली. मात्र त्यांचाही तिथे जम बसत नसल्याने त्यांनीही पूर्णवेळ त्यांना मदत करायची ठरवलं आणि अशा रीतीने डिसेंबर २०१५ मध्ये त्यांनी ‘मेजवानी’ रेस्टॉरंट सुरू केलं.

सुप्रिया यांना सणांच्या काळात पुरणपोळी, मोदक यांच्याही ऑर्डर असतात. न्यू जर्सीहून जवळच्या शहरांमध्ये त्यांच्या पुरणपोळ्या पार्सल केल्या जातात. तसंच त्यांना पूजेच्या जेवणाचीही ऑर्डर असते. हे जेवण कांदा-लसूणविरहित बनवावं लागतं आणि ते त्याच पद्धतीनं बनवलं जाणार याची खात्री आता स्थानिकांना झाली आहे. त्यांनी केलेल्या कष्टाचं ग्राहकांच्या पसंतीमुळे चीज झालंच, शिवाय मराठी जेवणाचा प्रसार केल्याचा आनंद मिळतोय तो वेगळाच. त्या आनंदाची ‘मेजवानी’ त्या अशाच देत राहोत, ही शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1Shares
error: Content is protected !!